Saturday, 31 March 2018

तैनाती फौज

*तैनाती फौज* (मराठी(देवनागरी) टाईपिंग  ऐप्सबाबतचे माझे मत)
 .... सृजनघन

आपण मराठी कसे शिकलोत? 

इंग्रजीतून की  देवनागरी लिपीतील मराठी मुळाक्षरांनुसार? 

नंतर मराठी बाराखडी शिकलोत. अंकवाचन शिकलोत..  पण तेही मूळ मराठीतूनच ना?

मग आता मराठी लिहायला हा इंग्रजीचा पांगूळगाडा  हवा कशाला?  आपल्या आईशी बोलताना मध्यस्तीला दुसरी  कोणी आंग्ल व्यक्ती आपणास लागते का?  भाषांतर करायला?  पटकन कळावे म्हणून? सोपे  व्हावे म्हणून?

मग हे App हवेत कशाला?  मराठीसाठी 2010 साली  युनिकोड हा जागतिक पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी फॉन्टच्या काही अडचणी होत्या. त्या आता राहिल्या नाहीत.  मग जसे लिहितो तसे काना मात्रा उकार देऊन टंकित करायला अडचण काय? उद्या पुरणपोळी करायला इंग्लंड अमेरिकेतून  यंत्रे आयात करणार का?  आणि भले काही कारणाने केल्यानंतर त्या पोळीला आईच्या हातच्या पोळीची चव येईल का? 

आपली भाषा टंकायला शिकताना परकीय भाषेची कुबडी का घ्या?  जशी रावबाजीची इंग्रजी तैनाती फौज!
इन्स्क्रिप्ट मराठी हाच स्मार्टफोन किंवा काँम्प्युटर वर टायपिंगसाठी सर्वात चांगला मराठी की बोर्ड आहे अशी माझी पक्की खात्री झाली आहे.
खरेतर मला सन 1999 पासून संगणकावर मराठी टायपिंगसाठी फोनेटिक इंग्रजी वापरायची अंगी भिनलेली सवय होेती. फोनेटिक इंग्रजीच्या मदतीने तासाभरात एका वेळेस मी 5 ते 6 पेजेस टाईप करू शके.  व मला मराठी टाईप करण्यास ते फारच उपयुक्त सॉफ्टवेयर आहे व ते आपण नेहमीच वापरत रहायला हवे असे वाटत असे. पण नंतर असेच एकदा फेसबुकवर श्रीमती लीना मेहेंदळे IAS  , सध्या सेवानिवृत्त  यांच्याशी या मराठी टायपिंग बाबत संवाद झाला. त्यांचे मत होते की आपण मराठी भाषा वापरताना तात्कालिक विचार न करता पुढील कित्येक वर्षे ही भाषा जिवंत रहावी म्हणून  विचारपूर्वक काही बाबी केल्या पाहिजेेत. त्यांचा आग्रह होता मराठी फोनेटिक मराठी म्हणजे इंग्रजीत टाईप करून त्याचे मराठीत शब्द येतात याचा वापर आता  बंद करायला हवा. मराठी  भाषा टिकायला हवी तर आपण मूळ रूपात ती टाईप करायला शिकले पाहिजे. इन्स्क्रिप्ट या की बोर्ड च्या वापराबाबत बाबत जागृती आवश्यक आहे. की बोर्ड म्हणजे मराठीत कळपट्टी. मागील काही वर्षापासून संगणकावर मराठी टाईपरायटींग साठीच्या  मराठीच्या अनेक कळपट्ट्या वापरात होत्या/आहेत. रेमिंग्टन मराठी , टाईपरायटर मराठी , फोनेटिक इंग्रजीतून मराठी, आणि इतर  अनेक एपस (Apps) .  संगणकात किंवा स्मार्टफोनमध्ये जसजशी नवनवीन सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम्स येत गेल्या तसतसे  याचा वापर करताना अडचणी उद्भवत. त्यात भरीस भर नॉन म्याचिंग फॉन्टसची . याला उपाय आला युनिकोड. पण इनपुट साठी जगाच्या पाठीवर विविध प्रकारच जरीे टायपिंग होते फक्त इन्स्क्रिप्ट अशा प्रकारची कळपट्टी आहे ती जगात कोठेही गेलात तर तीच राहील. आपण मराठी मुळाक्षरे शिकताना ती मूळ मराठीतच शिकलोत.. त्याला इंग्रजीच्या कुबड्या नाहीत घ्याव्या लागल्या कधी. तसे मराठी टायपिंगदेखील मूळ रूपात म्हणजे  इन्स्क्रिप्ट कळपट्टी वापरून का करता येऊ नये ?  नवीन युगात स्मार्टफोनचा  वापर जसजसा अधिकाधिक  रूढ होत गेला तसतशी मराठी अक्षरे टाईप करण्याची अनेक नवनवीन एप्स विकसित होत गेली. वापरात आली. मूळ मराठी भाषा उच्चारानुसार लिहिली जाते.काही अपवाद वगळता  बोललेला व ऐकलेला कोणताही शब्द किंवा आवाज मराठी लिपीत व्यक्त करता येतो.  इंग्रजी भाषा समृद्ध  असली तरी तिच्या उच्चारात काही कमतरता आहेत. मरायला का मारायला असा परस्परविरोधी अर्थ ही होऊ शकतो.
मराठीवर प्रेम असेल व ही भाषा पुढे टिकावी असे वाटत असेल तर थोडा त्रास सहन करावा लागला तरी चालेल मी प्रयत्न करणार असा विचार व आचार अंतिमत:  यश देतोच देेतो. मलाही हे अवघड वाटलेले. पण सरावाने सगळे शक्य होते. स्वानुभव आहे माझा. एकदा का आपल्या स्वतःच्या पायावर चालता येऊ लागले की मग पांगुळगाडा व कुबड्या आपोआपच गळून पडतील . टायपिंगचा क्लास लावावा लागतो हा एक मोठाच गोड गैरसमज. लग्नानंतर किती स्त्रिया कुकिंगचा क्लास लावून रोजचा स्वयंपाक शिकतात ? कितीजणी मुलांना सांभाळताना त्यांचे पालनपोषण कसे  करावे याचा क्लास लावतात ? हळूहळू सरावाने जमेल सारे. इच्छा मात्र हवी. पटायला हवे. एक्स्पर्ट व्हाल यात मला यत्किंचितही शंका नाही.
 माझी पंधरा वर्षाची जुनी सवय मी मोडली. अशक्य वाटायचे आधी पण सरावाने जमू लागते.
नंतर याचा  उपयोग कुठेही  संगणकावर टाईप करताना होतो हे मात्र नक्की. फोनेटिक सगळ्या संगणकांवर नसते. त्यातच फॉन्ट म्यॉचिंगच्या लडतरीही होतात.
मी गुगल मराठी इनपुट  सुरुवातीला काही काळ वापरले आहे.  स्वरचक्र मराठी पण वापरलेय. नवीन  कोणतेही मराठी टायपिंगचे app दिसले की डाऊनलोड करून वापरले आहे . मला नियमित टायपिंगचा  फार कंटाळा  येत असे. पण अशा Apps वर  अवलंबून राहावे लागते. ऑफलाईन टायपिंगची अडचण होते. माझा प्रश्न असा की मूळ स्वरूपात टायपिंग  का नाही करायचे ? आता मी एकही असे टायपिंगचे   App वापरत नाही. असे  Apps आपला वैयक्तिक  डाटा वापरू शकतात हेदेखील मला एका  मित्राने सांगितले होते .
Apps चा हा भूलभुलैया आहे. मूळ भाषेत टायपिंग करायला शिकाल तर ते कायमचेच. काही उपयुक्त याप्स (Apps)  नंतर दगा देतात अपडेटसाठी.
 मोबाईलवर मराठी टाईप करताना इतर कोणतेच  एप्प आवश्यक नसते. मूळ इन्स्क्रिप्ट कळफलक पुरेसा आहे.

English typing is easy. मराठी अवघड आहे. जास्त वेळ घेते असे काहींचे मत असते. इंग्रजीच्या तुलनेत मराठी टायपिंगला जास्त वेळ लागतो हे खरे पण या कारणाने मराठी टाईप करायचाच कंटाळा कराल  तर नक्कीच काही दिवसांनी मराठी लिहिणेदेखील विसरून जाईल . वाचनासोबतच मराठीत आपण लिहीत व टाईपदेखील करत राहिले पाहिजे.
 तुम्ही मराठीऐवजी परकीय भाषेचा आधार घ्यायला अधिक उत्सुक का आहात ?  मान्य आहे की इंग्रजी भाषा रोमन लिपीतच टाईप होते. मराठी पण तशीच ? इंग्रजीच्याच दावणीला मराठी बांधायची ती का? जास्त दूध देते म्हणून जर्सी व होल्स्टन फ्रिजियन गाई आपण वाढवल्या. मूळच्या देशी गाई नामशेष झाल्या. मराठीची दुर्गती कशी होऊ घातलीय ते पहा. सुरुवातीला सोपे वाटते पण मराठीतली मूळ वर्णाक्षरे न वापरता इंग्रजीत इनपुट देणारी  रोमन लिपी का वापरायची?
 मराठी जिवंत रहायची  तर ती तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसह मराठीजनांच्या नित्य वापरात रहायला हवी.  तिही इंग्रजीचा टेकू न घेता केवळ तिच्या स्वतःच्या आधारानेच. इंग्रजांच्या तैनाती फौजेबाबत  एतद्देशीयांना सुरूवातीला चांगलेच वाटले होते. ऩंतर हळूहळू इंग्रजी सत्तेने हातपाय पसरले. माझी मराठी इंग्रजीत का टाईप करू ? का?
तैनाती फौज सोपी आहे.  केवळ ऱोजचा खर्च द्यायचा . आपले व राज्याचे ती संरक्षण करणार. आपण निवांत .

पण तैनाती फौजेची सवय लागल्याने आपली मूळ फौज लढाई कशी करतात ते विसरते त्याचे काय ?

  मराठीसाठी  इंग्रजीशिवाय पर्याय नाही ही मनोवृत्ती का ? या मनोवृत्तीमुळेच
मराठी टिकणे मुश्कील होत चालले आहे.

 गुगलने हे मराठीचा फार पुळका आहे म्हणून गुगल मराठी सॉफ्टवेअर सुरू केलेले नाही तर हा त्यांच्या व्यावसायिक दृष्टीचा भाग आहे तो. साहेबाने त्याची सोय म्हणून दळणवळणाच्या व संपर्काच्या सोयी केल्या होत्या.  एका गुलाम देशाची  मदत किंवा सोय व्हावी म्हणून नाही.

 काही मित्रांनी मला सांगितले की तुर्तास मराठीसाठी इंग्रजी  टायपिंग (फोनेटिक) सोडता येणार नाही.  त्यांचे हे मत मात्र मला अजिबात पटलेले नाही. माझी माय मराठी तिच्या मुळाक्षरांसह सक्षम असताना मी इंग्रजीच्या कुबड्या का वापराव्यात ? केवळ टायपिंगला माझा काही अधिकचा वेळ जातो म्हणून? की इंग्रजीत टाईप वेगाने होते म्हणून ? इंग्रजीचे इतके अतिक्रमण होत असताना पुढे
दैनंदिन वापरातल्या  मराठी भाषेचे भवितव्य  काय असेल ते येत्या वीसेक वर्षात कळेलच. आता मला पुढच्या पिढीत याची थोडीफार चुणूक दिसली  आहेच. मराठी विसरेल म्हणजे मूळ रूपात ती लिहिणे अवघड वाटेल. प्रयत्न करूनही काही जोडाक्षरे असलेले शब्द टाईप करताना आधी कोणते अक्षर वा शब्द येतो व आपला शब्द चुकला की काय याचीही कधीकधी भ्रांती पडते . . टंकलेखन करताना वा हातान लिहिताना कानामात्रा अनुस्वार देऊन लिहिले जाणारे मराठी उपयोगात नाही आणले तर पुढे हे असेच होणार. सैनिक आळशी होणार. सर्कशीतले सिंह पुन्हा अरण्यात सोडले तर त्यांची बचावाची सवय वा  शिकारीची सवय गेलेली असल्याने परावलंबी ठरतात. त्यांना जंगली शिकारी कुत्रीदेखील भारी पडतात.  Calculator चा वापर इतका वाढला की साध्या बेरजा चुकू लागाव्यात ? पण ही धोक्याची  घंटा ऐकू येईल तर खरी!

मराठी भाषेत गर्व हा निंदाव्यंजक शब्द आहे. तो स्वत:साठी मराठी माणूस वापरत नाही. पण हिंदीत हाच शब्द अभिमान या अर्थाचा आहे. तो हिंदीत वापरला तर निंदाव्यंजक नाही.अभिमानाला गर्व शब्द वापरणे म्हणजे मराठीचा अपमान  करणेच होय. किती आहारी गेलोत आपण . . च आणि ज चे मूळ  मराठी उच्चार आपण हिंदीत करतात तसे करू लागलोत.

माझा इंग्रजीला मुळी विरोध  नाहीच. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणे म्हणजे इंग्रजीला विरोध असे समीकरण नाहीच. मी उत्तम इंग्रजीत़़ बोलता यावे लिहिता वाचता यावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. पण मराठी टायपिंग हे इंग्रजीचा आधार घेऊन केल्यास त्याचे भविष्यात दूरगामी परिणाम  मात्र मराठीस  मारक होतील असे माझे मत बनले आहे.  मराठी ही देवनागरीतच बोलावी लिहावी व वाचावी याबाबत मी आग्रही आहे. मोेडी लिपी आजच्या मराठी भाषेतून हद्दपार झाली आहे. ती वापरात नसल्यामुळेच. ती वापरात असती तर आज आपणास एक दुसरी लिपी म्हणून वापरता आली असती.  मराठी वाचणे हा एक भाग बोेलणे  दुसरा भाग व लिहिणे तिसरा भाग. तिन्ही  भाग जिवंत  रहावेत व टिकावेत. मिझो भाषा रोमन लिपीत लिहीतात. कोकणी देखील लिहितात व  मराठीही लिहीता येईल.
मराठीत  लिहिणे वाचणे  टाईप करणे टिकून राहिले म्हणजे  मराठी टिकणे. आता बाहेरून ऑर्डर करून  आम्ही नेहमीच इंग्लीश पद्धतीने काट्या चमच्याने  पुरणपोळी खातो याची प्रौढी मिरविणारे आहेतच.  आम्ही मात्र आलकट पालकट घालून हातानेच भुरका मारून खातो.  इंग्रजाळलेली पिढी आणखी काही वेगळे आत्मसात करील.  आणखी याचा आम्हास गर्व आहे म्हणूनही वर फुशारकी  मारेल काय सांगावे?
 
   पुढच्या पिढीला तर अक्षरे टाईपच करावी लागणार नाहीत. नुसते बोला. फोनेटिक इंग्रजी तैनातीला आहेच. नंतर पाहिजेे तो मजकूर इंग्रजीत टाईप झाल्यानंतर तोच  इंग्रजी मजकूर   मराठीत बोलीभाषेत भाषांतरित (रुपांतरित ) करून देण्याची सोयही वापरात येईल. झाला रेडिमेड मराठीचा बुरखा तयार. काही व्यापच नको टायपिंगचा. बोले तैसा टंके . व्हाया माध्यम इंग्रजीतून पाहिजे त्या बोलीभाषेतील मराठीत. पूर्वी शब्दकोष कपाटातून काढून चाळावा लागे. तो पाहताना मागचे पुढचे चार शब्द नजरेखालून जात . आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अचूक शब्दसंग्रह आहे. पण वापरातला  शब्दसंग्रह कमी झाला.  मराठी टायपिंग एक दिवस पूर्ण विसरेल. आणि वापरातील मराठी लुप्त होण्याकडे मार्गस्थ होईल तीही आपल्या समोर आपल्याला साक्ष ठेऊन. नवी पिढी कितीसे अक्षर  घोटवून घेते? हस्ताक्षराची जशी गत झाली आहे तशीच काहीशी टंंकलिखित मराठीचीही होईल. मराठीच्या आजच्या काही आघाडीच्या वृत्तपत्रातली या  गुगलच्या भाषांतरित मराठीमुळे झालेली काही हास्यास्पद प्रसिद्ध  मासलेवाईक उदाहरणेही आहेत.
शिखरावर डायरेक्ट हेलिकॉप्टर  मध्ये बसून जायची सवय लागली की  तीच बरी वाटते. पण पायाचे स्नायू त्याच्याच मजबूत होतात जो पाय-या चढून जातो किंवा डोंगराची वाट पायाखाली घालतो. 

माझी याबाबतची मते स्पष्ट आहेेत.माय मराठीला शॉर्टकट कशाला?  मराठीत टाईप करणे मला कधीच कंटाळवाणे वाटत नाही. आपल्या माणसाशी  बोलताना कधी कंटाळा येतो का?  परदेशी इंग्रज किती चिकना चुपडा असला म्हणून गावाकडची सर त्याला थोडीच येणार? 
काहीजण प्रतिवाद करतात की या ऐप्समुळे वेळ वाचतो. लवकर मराठी टाईप होते. ऐप्सच्या मदतीने भरभर टाईप करणे सोयीचे आहे.
पण पटकन जेवण व्हावे व तुमचा बहुमूल्य वेळ वाचावा म्हणून भविष्यात काटा चमच्याने पुरणपोळी देखील खायला शिकवण्याची जाहिरात करायलाही पुढे असतील नवीन ऐप्स!

इंग्रज हेच म्हणत होते..
भारतावर आम्हीच राज्य  करतो.. तुम्हाला जमणार नाही...

कशाला स्वतंत्र होता?  आमचे राज्यच चांगले आहे. आम्हीच चांगल्या प्रकारे राज्य करू शकतो. तुम्हा देशी लोकांना हे जमणार नाही.

आज स्वातंत्र्यानंतरही आपण मराठी लिहिण्यासाठी इंग्रजीच्याच कुबड्या वापरतो ? कारण ते फास्ट आहे म्हणून? पण मला मात्र ही गुलामगिरीची पडछायाच वाटते.

माझी आई कशीही असो भलेही  ती बाह्य रुपाने फार देखणी नसो. भलेही ती फार मॉडर्न नसो. मला तीच प्रिय वाटेल. मायमराठी माझी आई आहे. ती एक समृध्द वारसा घेऊन आली आहे.

    आता काही करून इंग्रजांच्या तैनाती फौजेचे हे जोखड झुगारून द्यायलाच  हवे. प्रयत्नाने आपल्या  हातापायात ताकद नक्की येईल .आपण पुन्हा स्वत:वर विश्वास जागवू शकू! असे झाले नाही तर दुुर्दैवाने पुढील एकदोन पिढ्यातच टंकलेखनातील मूळ मराठीतली देवनागरी लिपी अस्तंगत होत जाईल व अनवधानाने का होईना पण माय मराठीच्या पायावर धोंडा घालावयाच्या या पातकात समावेश असणा-या मराठीजनांच्या श्रेयनामावलीत आपलेही नाव अग्रभागी असेल हे मात्र नक्की! 

*सृजनघन*

No comments:

Post a Comment

आठवणी

कोल्हापूर कृषि महाविद्यालयात शिकत असतानाच्या संटेपणातील अनेक आठवणी आहेत. खरे तर आपल्याच कॉलेजच्या मुली म्हणजे वर्गभगिनी . बहिणींचेही भावावर...